नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कल्याण – डोबिंवली लोकसभा मतदार संघात विद्यमान शिवसेना खासदार डॅा. श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून या जागेवर भाजपने दावा केला होता. त्यामुळे ही जागा भाजपला की शिंदे गटाला यावर चर्चा रंगली होती.
भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर नागपुरात देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
फडणवीस म्हणाले की, श्रीकांत शिंदे हेच आमचे उमेदवार असतील, भाजपचा पाठींबा असेल, त्यांना मोठ्या मतांनी निवडून आणू.
आतापर्यंत शिवसेना शिंदे गटाने दोन वेळेस उमेदवारांची घोषणा केली. पण, त्यांच्या उमेदवारांची घोषणा पहिल्यांदा भाजपने केली. या मतदार संघात स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा प्रचंड विरोध असल्यामुळे ही घोषणा फडणवीस यांनी केली.
आता या मतदार संघात ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर व श्रीकांत शिंदे यांच्यात सामना रंगणार आहे.