वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
जंगली प्राण्याच्या आजूबाजूला वावरताना काळजी ही घेतलीच पाहिजे, कारण ते कधी आक्रमक होतील हे सांगता येणार नाही. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आफ्रिकन देश झांबियाच्या काफू नॅशनल पार्कमधील आहे. ३१ मार्च रोजी पर्यटक फोटोग्राफी करण्यासाठी पहाटे टूरवर निघाले. त्यावेळी पर्यटकांमधील एक व्यक्ती स्वतःच्या मोबाईलमध्ये हे सर्व शूट करून घेत होती. बघता बघता एक हत्ती येतो आणि पर्यटकांवर जोरदार हल्ला करतो असे व्हिडिओमध्ये आहे.
हत्ती जवळ आल्याचं पाहून पर्यटक घाबरले आणि आरडाओरडा करू लागले. त्यानंतर अचानक हत्तीनं गाडीला धडक दिली आणि सफारी ट्रक उलटा केला. त्यानंतर हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला; त्यात दोन जण जखमी आणि एका ८० वर्षीय महिला पर्यटकाचाही मृत्यू झाला’, असे सांगण्यात येत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ginnydmm या X अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या ग्रुपच्या सीईओने या प्रकरणाबद्दल माफी मागितली आणि सांगितलं, ‘आमचे सर्व मार्गदर्शक खूप प्रशिक्षित आणि अनुभवी आहेत. पण, दुर्दैवानं ही घटना घडली. यात हत्तीच्या हल्ल्यापासून आम्ही स्वतःला वाचवू शकलो नाही. आम्ही जीव गमावलेल्या पर्यटकाच्या कुटुंबाप्रति आम्ही मनापासून शोक व्यक्त करतो’, असे सीईओ म्हणाले आहेत.