जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जळगावमध्ये भाजपने खासदार उन्मेष पाटील यांचा पत्ता कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यानंतर पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांचे सहकारी करण पवार यांना लोकसभेची उमेदवारी मिळवून दिली. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गट आता जळगावमध्ये भाजपला आणखी मोठे खिंडार पाडण्याच्या तयारीत असल्यामुळे भाजपचे नेते खडबडून झाले. शिवसेनेने जळगावचे ३० नगरसेवक फोडण्याचे लक्ष ठेवल्याचे बोलले जात आहे.
या सर्व घडामोडी सुरु असतांना मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या नगरसेवकांसोबत बंद दाराआड चर्चा झाली. त्यांना पक्ष सोडून न जाण्याची तंबी दिली. पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर जळगावात बंद दाराआड या बैठका होत आहेत. ठाकरे गटाने महापालिकेतील भाजपचे नगरसेवक फोडण्यावर भर दिल्याची चर्चा आहे. ठाकरे गट नगरसेवक फोडण्याच्या तयारीत असल्याची बातमी फुटली. त्यानंतर महाजन यांनी तातडीने भाजपच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन नगरसेवकांना पक्ष सोडून न देण्याची तंबी दिली.
या वेळी महाजन यांनी नगरसेवकांची झाडाझडती घेतली. प्रत्येक नगरसेवकाला मतांचे टार्गेट देण्यात आले असून मतदारसंघातून मताधिक्य मिळाले, तरच महापालिकेचे तिकीट देऊ, असा गर्भित इशारा दिला आहे. मताधिक्य द्यावेच लागणार आहे, असा दम महाजन यांनी नगरसेवकांना भरला आहे. आता हे टार्गेट नगरसेवक पूर्ण करतात की ठाकरे गटात जातात हे बघावे लागेल…