नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यामुळे भाजपच्या युवा मोर्चाने माजी मंत्री विलास मुत्तमेवार यांच्या घरासमोर आंदोलन केले. त्यानंतर मुत्तेमवार यांनी या आंदोलनावर टीका करत भ्याड कृत्य म्हटले आहे. ते म्हणाले की, भाजपच्या स्वार्थाच्या राजकारणाला सामान्य माणूस कंटाळला आहे. इंडिया आघाडीतील उमेदवार विकास ठाकरे यांना शहरात मिळणारा प्रतिसाद बघून भाजपचे नेते चवताळले आहे. मी कालच्या सभेत उपस्थित केलेले महागाई, बेरोजदारी, भ्रष्टाचाराचे प्रश्न भाजपला झोंबले आहे. जनतेचा कौल बघून भाजपचे लोकसभा उमेदवार नितीन गडकरी स्वतः घाबरले आहेत. त्यामुळे त्यांनी भायुमोच्या कार्यकर्त्यांना माझ्या घराजवळ भ्याड कृत्य करण्यासाठी पाठवले. शंकरनगर येथील निवासस्थानाजवळ भायुमोच्या कार्यकर्त्यांच्या अवैध गोंधळ केल्याचेही ते म्हणाले.
पुढे मुत्तमेवार म्हणाले, नागपुरात प्रत्येक विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा मिळत आहे. सर्व मतदार हे सुज्ञ असून त्यांनी भाजपचे आभासी विकास अनुभवले आहे. शहरातील जनतेने परिवर्तानाची हाक दिली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. म्हणून आचारसंहिता लागू असताना विना परवानगी मोठ्या संख्येत भाजपा युवा मोर्चाचा टोळका माझ्या घरा जवळ पूर्वनियोजितपणे गोळा झाला. त्यांनी माझ्या विरोधात अश्लिल घोषणा दिल्या. एक पुतळाही त्यांनी जाळला. यावरुन नितीन गडकरी किती घाबरले आहेत. हे दिसून येते.”
आमच्याकडेही हजारो कार्यकर्ते प्रत्येक मतदार संघात सक्रीय आहेत. त्यांना जर घटनेबद्दल कळालं असतं तर त्यांना इथे पोहोचण्यापासून कोणी अडवू शकत नव्हता. मात्र आम्हाला शहराचे वातावरण शांत हवे आहे. आम्हाला निवडणूका शांततेत पार पाडायच्या आहेत, म्हणून आम्ही कायद्याच्या मार्गाने चालत आहोत. आजची घटना ही खूप खालच्या पातळीची असून या अवैध कृत्याबाबत आम्ही तक्रार दाखल केली आहे. संबंधीतांवर गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.’
पोलिसांची बघ्याची भूमिका…
भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत माझ्या घराजवळ विना पोलिस परवानगी गोळा झाले. त्यांनी अश्लिल घोषणाबाजी केली. एक पुतळाही जाळला. हे सर्व सुरु असताना पोलिस बघ्याच्या भूमिकेत होते. कायदा सुव्यवस्था सांभाळणारे जर सत्ताधाऱ्यांपुढे नतमस्तक होत असतील तर याचा जाब विचारण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. याविरोधात आपण तक्रार दिली असून यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नसल्याचेही यावेळी मुत्तमेवार म्हणाले.