नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) राष्ट्रीय विकास मंडळ, गुणगौरव न्यास व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पहिल्या दिवशी हिंदुस्तानी कथ्थक, भरतनाट्यम, तबला, बासरी, शास्त्रीय गायन, सुगम संगीत ह्यांचा एकत्रित आविष्काराने गोदाघाट संगीताच्या स्वरांनी फुलला होता निमित्त होते भव्य दिव्य अशा ‘अंतर्नाद’, गायन-वादन- नृत्याचा अनोखा आविष्कार या कार्यक्रमाचे.
फाल्गुन कृष्ण ११, शके १९४५ – शुक्रवार ५ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता ‘पाडवा पटांगण (जुने भाजी मार्केट), नारोशंकर मंदिराजवळ, पंचवटी’ येथे अंतर्नाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. किराणा घराण्याच्या सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना अंतर्नाद कार्यक्रमातून हि स्वरांजली समर्पित करण्यात आली होती. शहरातील शास्त्रीय संगीतातील गायन, वादन आणि नृत्यक्षेत्रातील ७२ गुरुकुलांच्या १६२१ हून अधिक कलाकारांचा एकत्रित कलाविष्कार प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रामपूर सहस्वान घराण्याचे उस्ताद रशीद खान यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित प्रसाद खापर्डे हे उपस्थित होते. जे आज भारतातील सर्वोच्च गायकांपैकी एक आहेत.
या कलाविष्कारात प्रारंभी सर्व गायकांनी श्रीराम वंदना सादर केली. त्यानंतर लहान गटातील कलाकारांचे राम भीमपलास मधील रचना गायन, आलापी आणि बासरीवादन केले. मग पुढे शिवरायांची आरती यावर कथ्थकनृत्य प्रस्तुत झाले. त्यानंतर वंदनम रघुनंदनम या बोलांवर चिमुकल्या नृत्यांगनांचे भरतनाट्यम रंगले.मग राग बिहाग वरील बंदिश, स्वर बासरीचे, त्या तबलासाथ करण्यात आली, गायकांचे राग यमन तर मोठ्या कलाकारांचे राग मालकंस सादरीकरण झाले. पुढे भिन्न षड्ज बासरीवादन कथ्थक व भरतनाट्यम सरगम सादरीकरण राग चंद्रकंस, कथ्थकचे तोडे पढंत तर भारत भरतनाट्यमचे कोरवई प्रस्तुत झाले.
शेवटी सर्व गटांचे एकत्रित सादरीकरण त्यात श्रीराम कृपाळू भजनम, कानडा राजा पंढरीचा, मराठी अभिमान गीत यावर दीपनृत्य, जयोस्तुते या गाण्यांवर गायन, वादन आणि नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. या अंतर्नाद कार्यक्रमाचे प्रमुख निनाद पंचाक्षरी आणि सहप्रमुख केतकी चंद्रात्रे हे होते तर सूत्रसंचालन सुनेत्रा मांडवगणे यांनी केले. या कार्यक्रमांमुळे नागरिकांमध्ये नववर्षाचे स्वागत करण्याचा उत्साह द्विगुणीत झाला. यावेळी डॉ महेश भागवत दळे, (IDAS अधिकारी 2010 बॅच) BAMS (MS Surgery), हेमंत धात्रक, पंचवटी पोलीस स्टेशनचे सीनिअर पीआय मधुकर कड, विजय साने, नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष शिवाजी बोन्दार्डे, उपाध्यक्ष चंद्रशेखर जोशी, गुणगौरव न्यास चे अध्यक्ष आणि नववर्ष स्वागत समिती चे मार्गदर्शक प्रफुल्ल संचेती, विश्वस्त राजेश दरगोडे, जयंत गायधनी, जयेश क्षेमकल्याणी, स्वरूपा मालपुरे हे उपस्थित होते. या वर्षी “स्वदेशी” हा या सर्व कार्यक्रमाचा विषय (थीम) आहे.
कार्यक्रमात उद्या – महावादन
फाल्गुन कृष्ण १२, शके १९४५ – शनिवार ६ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता महावादन क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांना समर्पित.
महावादन प्रमुख – प्रितम प्रेमराज भामरे
मुख्य अतिथी / प्रमुख पाहुणे – श्री किसनराव जाधव (क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे वंशज), पुणे
कुसुमताई बाबासाहेब गोपले (राष्ट्रीय नेत्या अखिल भारतीय मातंग समाज, समाजसेविका)
श्री वरुण सर्जेराव भामरे (वास्तुसंवर्धक) रायगड विकास प्राधिकरण, नाशिक,
श्रीकांत साळवे (ताशा सम्राट), पुणे
पै.केतन अशोक साळवे. गंज पेठ पुणे (आद्य क्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांचे वंशज)
30 हुन अधिक पथके सहभागी असतील
सहभागी पथक- नाशिक शहरातील तसेच सिन्नर ग्रामीण मधील दिंडोरी, लासलगाव, सायखेडा, पालखेड.
सादरीकरण – यावर्षी अयोध्या रामजन्मभूमी श्री राम मंदिर स्थापना झालेली असून या वर्षी भीमरूपी तालासह पारंपरिक आवर्तन वादनात रंगत आणतील त्यासोबत ढोल ताशा ध्वजा सोबत बरची नृत्य सादरीकरण असेल.