नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यात 20 दिंडोरी आणि 21 नाशिक लोकसभा मतदार संघासाठी 26 एप्रिल ते 3 मे 2024 या कालावधीत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 3 अशी वेळ निर्धारित करण्याण्त आली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करतांना उमेदवारांनी खालील दिलेल्या बाबींचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत.
26 एप्रिल 2024 पासुन संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशन पत्र विहीत नमुना ” 2A ” शपथपत्र नमुना – 26 मिळू शकतील. उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रचा विहीत नमुना ”2A” भरावयाचा आहे. उमेदवारास निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे शपथ / दृढकथन करावे लागेल. शपथपत्र नमुना – 26 प्रथम वर्ग दंडाधिकारी / नोटरी यांच्यासमोर स्वाक्षरी करून सादर करावे. उमेदवारास मतपत्रिकेवरील फोटोबाबतचे घोषणापत्र सादर करावे लागेल. मतपत्रिकेवर नाव कसे असावे याबाबतचे उमेदवाराचे लेखी पत्र आवश्यक आहे. नामनिर्देशनपत्रासोबत जमा करावयाची अनामत रक्कम रूपये 25 हजार असून अनु. जाती अथवा अनु.जमाती वर्गातील उमेदवारासाठी अनामत रूपये 12 हजार 500 अशी असून सदर रक्कम रोख स्वरूपात जमा करणे आवश्यक आहे. एक उमेदवार जास्तीत जास्त 4 नामनिर्देशनपत्र सादर करू शकतो. तसेच एक उमेदवार दोनापेक्षा जास्त मतदारसंघात अर्ज करू शकणार नाही. उमेदवार राजकीय पक्षाचा असल्यास एक सूचक तर अपक्ष असल्यास एकूण 10 सूचक आवश्यक आहे. राजकीय पक्षांचे उमेदवार यांनी पक्षाने प्राधिकृत केल्याबाबत विहीत सूचना पत्र ( AA & BB ) हे नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी दुपारी 3.00 वाजेपुर्वी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडेस जमा करणे आवश्यक आहे. नामनिर्देशनपत्रासोबत सादर करावयाचे विहीत शपथपत्र नमुना 26 मधील सर्व रकाने भरणे आवश्यकअसून एखादी बाब लागू नसेल तर ” निरंक ” / ” लागू नाही ” असा तपशील नोंदविणे आवश्यक आहे.
लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवाराची पात्रता
▪️उमेदवार हा भारतीय नागरिक असावा
▪️उमेदवाराचे वय 25 वर्षापेक्षा जास्त असावे.
▪️उमेदवाराचे नाव महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार यादीत असावे.
उमेदवाराचे मतपत्रिकेवरील (फोटो) छायाचित्राबाबतचे निकष
उमेदवारांनी साधारणत: तीन महिन्याचे आतील कालावधीत काढलेला फोटो निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडेस नामनिर्देशन पत्रासोबत किंवा जास्तीत जास्त छाननीच्या वेळेपुर्वी द्यावयाचा आहे. फोटोचा आकार 2 cm X 2.5 cm असावा. चेहरा समोर आणि पुर्ण तसेच डोळे उघडे , मागील बाजु पांढ-या रंगाची असावी. फोटो रंगीत किंवा ब्लॅक आणि व्हाईट चालेल. उमेदवारांनी सर्वसाधारण कपडे परिधान केलेले असावेत. कोणताही गणवेष असु नये. टोपी , हॅट व गडद रंगाचा चष्मा टाळावा. फोटोचे मागील बाजुला उमेदवाराची किंवा त्याचा निवडणूक प्रतिनिधी यांची स्वाक्षरी असावी. फोटो सोबत विहीत नमुन्यातील Ann. – 2 – ( उमेदवाराचे नाव , पत्ता असलेले आणि सदर फोटो लगतच्या तीन महिन्यापुर्वी काढलेला असल्याचे घोषणापत्र ) असावे. घोषणापत्र नामनिर्देशनपत्रासोबत देण्यात येणार आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने निश्चित करून दिली आहे. त्यानुसार उमेदवारास रूपये 95 लाख इतका खर्च मर्यादा निश्चित करून देणेत आली आहे. उमेदवारांनी निवडणूकीसाठी केलेल्या खर्चाचा हिशोब ठेवायचा असुन उमेदवारांच्या खर्चाचा तपशील तपासण्यासाठी लोकसभा मतदारसंघ निहाय खर्च निरिक्षक यांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाकडून करण्यात येते. नामनिर्देशन पत्र दाखल करणा-या उमेदवारांनी या सर्व बाबींची नोंद घेऊन नामनिर्देशन पत्र निर्धारित वेळेत दाखल करावयाचे असुन नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळी भारत निवड़णूक आयोगाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.