भोपाळ (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा मतदार संघात अर्ज बाद होण्याचे प्रमाण खूपच कमी असते. त्यात पक्षाचे अधिकृत उमेदवारांचे सहसा होत नाही. पण, मध्य प्रदेशमध्ये खजुराहो मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या उमेदवार मीरा यादव यांचा अर्ज रद्द करण्यात आला आहे. पन्ना जिल्हा निवडणूक अधिकारी सुरेश कुमार यांनी उमेदवारी अर्ज आणि जुन्या यादीवर स्वाक्षरी न केल्यामुळे मीरा यादव यांचे उमेदवारी अर्ज रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे. खजुराहोमध्ये आता फक्त भाजपचे उमेदवार व्हीडी शर्मा एकटे राहिले आहेत.
काँग्रेसने खजुराहोची जागा समाजवादी पक्षाला दिली होती. लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच समाजवादी पक्ष आणि काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्याने राजकीय पेच अधिकच वाढला आहे. मध्य प्रदेशच्या राजकीय इतिहासातील ही एक मोठी घटना आहे. मीरा या माजी आमदार आहेत, तर त्यांचे पती तीन वेळा आमदार राहिले आहेत. नामनिर्देशनपत्राची छाननी केली असता मीरा दीपक यादव यांचा अर्ज स्वाक्षरीअभावी फेटाळण्यात आला.
खजुराहो लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विष्णू दत्त शर्मा दुसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. आता या लोकसभेच्या जागेवर विरोधी पक्ष कोणत्या उमेदवाराला मदत करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या लोकसभा मतदारसंघातून सध्या काही अपक्षांनीही अर्ज दाखल केले असून १४ उमेदवार अद्याप रिंगणात आहे. ८ एप्रिलला माघारीचा शेवटचा दिवस आहे. त्यावेळेस नेमके काय होते ते बघणे गरजेचे आहे.