नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पेठरोडवरील अश्वमेधनगर भागात राहणा-या ३६ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गंगूबाई सिताराम सापटे (रा.कॅन्सर हॉस्पिटल जवळ,अश्वमेधनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. सापटे यांनी गुरूवारी (दि.४) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ सुरेश दराडे यांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार गवारे करीत आहेत.
भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत सात वर्षीय चिमुरडी जखमी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत सात वर्षीय चिमुरडी जखमी झाली. हा अपघात भगूर येथील विजयनगर भागात झाला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दुचाकीस्वार महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्णिका महेश व्यवहारे (रा.अमित सोसा.विजयनगर भगुर) असे जखमी बालिकेचे नाव आहे. आर्णिका व्यवहारे ही बालिका मंगळवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास आपल्या घरासमोरील कॉलनीरोडवर खेळत असतांना हा अपघात झाला होता. भरधाव येणाºया अॅक्टीव्हा दुचाकीने तिला धडक दिली होती. याबाबत वडिल महेश भिकन व्यवहारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीस्वार प्रियंका शैलेश भंडारे (रा.आर्क सोसा.विजयनगर) यांच्याविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार मिरजे करीत आहेत.
जुगारीला पोलिसांनी केले गजाआड
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पेठरोडवरील पालिका बाजार भागात नागरीकांना मटका जुगार खेळण्यास प्रवृत्त करणा-या एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताकडून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तौसिफ सय्यद ख्वाजा (४० रा.किस्मत बाग जवळ,जीपीओ रोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित जुगारीचे नाव आहे. पेठरोडवरील पालिका बाजार भागात एक इसम नागरीकांना जुगार खेळण्यास प्रवृत्त करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने धाव घेत संशयितास ताब्यात घेतले असता त्याच्या अंगझडतीत रोकडसह जुगाराचे साहित्य आढळून आले. स्व:ताच्या आर्थिक फायद्यासाठी तो परिसरातील नागरीकांना पैसे लावून मेनस्टार नावाचा जुगार खेळण्यास प्रवृत्त करीत होता. याबाबत हवालदार सागर कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक मालसाने करीत आहेत.