इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली – संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या मणिपूर हिंसाचारामधील एका अत्यंत दुर्दैवी घटनेने समाजमन हेलावून गेले होते. याठिकाणी दोन आदिवासी महिलांची नग्न धिंड काढण्यात आली होती. या घटनेचा संपूर्ण देशातून तीव्र निषेध नोंदविण्यात आला होता. यातील आरोपींनाही पोलिसांनी अटक केली. मात्र आता सीबीआय आक्रमक झाले असून त्यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
मणिपूरच्या कंगपोक्पि जिल्ह्यात मे महिन्यात दोन आदिवासी महिलांची नग्न धिंड काढल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलगा आणि सहा जणांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी आरोपपत्र दाखल केले. मणिपूर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचा या घटनेत सहभाग असल्याचे ‘सीबीआय’च्या तपासात निदर्शनास आल्यानंतर सोमवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले.
या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या इतर आरोपींची ओळख पटवण्यासह प्रकरणाच्या इतर पैलूंचा तपास सुरू आहे. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत आरोप ठेवले आहेत. ‘सीबीआय’ने गुवाहाटी येथील विशेष ‘सीबीआय’ न्यायालयात सहा जणांविरुद्ध आरोपपत्र आणि एका विधिसंघर्षग्रस्त अल्पवयीन मुलाविरुद्ध अहवाल दाखल केला. त्यातील आरोपानुसार ४ मे रोजी नग्न धिंड काढलेल्या एका महिलेच्या कुटुंबातील दोन सदस्यांचाही या हिंसाचारात मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
९०० लोकांचा जमाव
४ मे रोजी सुमारे ९०० ते एक हजार जणांचा जमाव, अत्याधुनिक शस्त्रे घेऊन, मणिपूरच्या कांगपोक्पि जिल्ह्यातील बी फायनोम गावात घुसला. या जमावाने तेथे तोडफोड केली आणि घरे जाळली आणि मालमत्ता लुटली. ग्रामस्थांवर हल्लेही केले. हत्या केल्या आणि महिलांवर लैंगिक अत्याचार केले, असे आरोपपत्रात नमूद आहे.