नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्टॉक मार्केट ट्रेंडिगच्या बहाण्याने तब्बल ७६ लाख रूपयांची ऑनलाईन फसवणुक करण्यात आली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंतवणुकीवर जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी शहरातील अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश धरमदास सचदेव (रा.जुना गंगापूरनाका) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सचदेव यांच्यासह अन्य नागरीकांशी डिसेंबर २०२३ मध्ये सायबर भामट्यांनी संपर्क साधला होता. ९१९००८५११९९२ या व अन्य व्हॉटसअप क्रमांकावरून संपर्क साधणा-या भामट्यांनी सचदेव यांच्यासह अन्य नागरीकांना केकेआर प्रो हे मोबाईल अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडून स्टॉक मार्केट ट्रेंडिग बाबत माहिती देवून ही फसवणुक केली.
यावेळी गुंतवणुकीवर अल्पावधीत जास्तीचा नफा असे आश्वासन देण्यात आल्याने सचदेव यांच्यासह अन्य गुंतवणुकदारांनी २७ फेब्रुवारी २०२४ पर्यत संबधीतांनी कळविलेल्या वेगवेगळया बँक खात्यात पैसे वर्ग केले. मात्र त्यानंतर संबधिताशी संपर्क तुटल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शेख करीत आहेत.