नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने करदात्यांना मूल्यांकन वर्ष 2024-25 (आर्थिक वर्ष 2023-24 शी संबंधित) साठीचे प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्याची सुविधा 1 एप्रिल 2024 पासून उपलब्ध करून दिली आहे. साधारणपणे करदात्यांकडून दाखल केले जाणारे प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजे ITR-1, ITR-2 आणि ITR-4, हे ई-फायलिंग पोर्टलवर 1 एप्रिल 2024 पासून उपलब्ध आहे. 1 एप्रिलपासून कंपन्या देखील ITR-6 द्वारे त्यांचे प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करू शकतील.
याच अनुषंगाने , केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने प्राप्तिकर विवरणपत्र अर्ज लवकर अधिसूचित केले होते, याची सुरुवात ITR 1 आणि 4 ने झाली होती ज्यांची अधिसूचना 22 डिसेंबर 2023 रोजी जारी करण्यात आली होती, तर ITR-6,ची अधिसूचना 24 जानेवारी 2024 रोजी जारी करण्यात आली होती तसेच ITR-2 ची अधिसूचना 31 जानेवारी 2024 रोजी जारी करण्यात आली होती.
ई-रिटर्न मध्यस्थांच्या (ERI) सोयीसाठी, ITR-1, ITR-2, ITR-4 आणि ITR-6 साठी JSON योजना आणि मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी कर लेखापरीक्षण अहवालांची योजना देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. ई-फायलिंग पोर्टलच्या डाउनलोड विभागात या संदर्भातील माहिती उपलब्ध आहे.
अशा प्रकारे, करदाते 1.04.2024 पासून ई-फायलिंग पोर्टलवर मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी ITR-1, ITR-2, ITR-4 आणि ITR-6 दाखल करु शकतात. खरे तर, मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी आतापर्यन्त सुमारे 23,000 प्राप्तिकर विवरणपत्र दाखल झाले आहेत. ITR 3, 5 आणि 7 दाखल करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे.
अलीकडच्या काळात प्रथमच, प्राप्तिकर विभागाने करदात्यांना नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विवरणपत्र दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. अनुपालन सुलभता आणि करदात्यांना निर्बाध सेवा प्रदान करण्याच्या दिशेने हे आणखी एक मोठे पाऊल आहे.