नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ पथकाने पेठरोड मार्गे राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करणारा मालट्रक पकडून साडे अठरा लाखाच्या गुटख्यासह मालट्रक असा सुमारे ३० लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत चालक क्लिनरला अटक करण्यात आली आहे.
अमोल ज्ञानोबा इंगुळकर (३७ रा. कामथडी ता.भोर,पुणे) व जाबीर अफजल बागवान (३६ रा.बारटक्के चौक शेजारी बुधवार पेठ सातारा) अशी प्रतिबंधीत गुटख्याची तस्करी करणा-या संशयितांची नावे आहेत. युनिटचे प्रदिप म्हसदे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पेठरोड मार्गे मालट्रकमधून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.४) युनिट १ च्या पथकाने सापळा लावला होता. मोती सुपर मार्केट भागात एमएच १२ एमव्ही ७५१० हा लेलंण्ड मालट्रक अडवून पथकाने पाहणी केली असता त्यात हिरा पानमसाला व सुगंधी तंबाखू असल्याचे पुढे आले.
चालक व क्लिनरला बेड्या ठोकत पथकाने सुमारे १८ लाख ५७ हजार १२० रुपए किमतीच्या गुटख्यासह मालट्रक असा ३० लाख ७ हजार १२० रुपए किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून मुद्देमालासह संशयितांना पंचवटी पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पडोळकर करीत आहेत. ही कारवाई युनिटचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर,उपनिरीक्षक गजानन इंगळे,रविंद्र बागुल,हवालदार प्रदिप म्हसदे,विशाल काठे,संदिप भांड,नाझीमखान पठाण प्रविण वाघमारे पोलीस नाईक प्रशांत मरकड,विशाल देवरे अंमलदार विलास चारोस्कर,जगेश्वर बोरसे,मुक्तार शेख,राजेश राठोड,अनुजा येवले व चालक समाधान पवार आदींच्या पथकाने केली.