मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील लोकसभा निवडणुक २०२४ च्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. यासाठी मराठवाडा व विदर्भातील मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. सायंकाळपर्यंत एकूण ३५२ उमेदवारांचे ४७७ अर्ज दाखल झाले आहेत.
त्यानंतर आज छाननीत वंचित आघाडीला मोठा धक्का बसला आहे. वंचितचे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातील उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे. अर्जात त्रुटी असल्याने उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. अभिजित राठोड यांचे निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघांमध्ये २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघाचा सामावेश आहे.
दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुलढाणा २९ उमेदवारांचे ४२ अर्ज, अकोला २८ उमेदवारांचे ४०, अमरावती ५९ उमेदवारांचे ७३, वर्धा २७ उमेदवारांचे ३८, यवतमाळ- वाशिम ३८ उमेदवारांचे ४९, हिंगोली ५५ उमेदवारांचे ७८, नांदेड ७४ उमेदवारांचे ९२ आणि परभणी ४२ उमेदवारांचे ६५ अर्ज दाखल झाले आहेत.