नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील उंटवाडी आणि नाशिकरोड येथील देवीचौक भागात राजरोसपणे सुरू असलेले जुगार अड्डे शहर पोलीसांनी बुधवारी उध्वस्त केले. या कारवाईत तेरा जुगारींना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांच्या ताब्यातून रोख रोकडसह,मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा सुमारे १ लाख ३९ हजार ७२० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबड आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाचे अंमलदार भरत राऊत यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे बुधवारी सायंकाळी उंटवाडी परिसरात पथकाने छापा टाकला असता पाटील नगरच्या दिशने जाणाºया मार्गावरील एका पत्र्याच्या शेडजवळ कचरू महादू कसाळ (३६ रा.शिंगवे बहुला,दे.कॅम्प), रवी हनुमंत गुंजाळ (३८ रा.लक्ष्मणनगर,पेठरोड),बाजीराव प्रकाश नगरे (३२ रा.उंटवाडी) व राकेश जाधव (रा.आरटीओजवळ,पेठरोड) आदी संशयित कल्याण नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून ९ हजार ५६० रूपयांची रोकड,मोबाईल व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत. दुसरा छापा नाशिकरोड येथील देवीचौक भागात टाकण्यात आला.
गोविंद कॉम्प्लेक्स या इमारतीच्या टेरेसवर जितेंद्र शंकर कोठारी (रा.ग्रॅण्डरोड,मुंबई), कृष्णा राधोजी शेगावकर (रा.लक्ष्मी केदार नगरी ना.रोड),सोमनाथ काशिनाथ मोरे (रा.कुंभारगल्ली देवळाली कॅम्प), संधीर सिंग गोपीनाथ राठोड (रा.खैरणार चाळ औरंगाबादरोड),प्रकाश भास्कर काजळे (रा. आकार सोसा. गंधर्वनगरी), अशोक देवराज मेहता, मनिलाल पुनमचंद जैन (रा. दोघे भांडुप,मुंबई), बापू निंबा जाधव (रा. ओझर) व राजेंद्र आत्माराम नागरे (रा.लोखंडे मळा,जेलरोड) आदी पत्यांच्या कॅटवर तीन पत्ती जुगार खेळतांना मिळून आले. ही कारवाई बुधवारी (दि.३) सायंकाळी करण्यात आली. या कारवाईत रोख रक्कम,मोबाईल व जुगाराचे साहित्य असा सुमारे १ लाख ३० हजार १६० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी अंमलदार नागरे यानी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.