नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कृषीनगर परिसरातील जॉगिंग ट्रक भागात आयपीएलच्या कोलकत्ता विरूध्द दिल्ली या क्रिकेट सामन्यावर कारमध्ये बसून बेटींग लावणा-या एकास पोलीसांनी अटक केली आहे. संशयिताच्या ताब्यातून मोबाईल, रोकड आणि कार असा सुमारे १६ लाख ५० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली.
महेंद्र अशोक वैष्णव (३४ रा. लक्ष्मी अपा.लामखेडे मळा,तारवालानगर) असे संशयिताचे नाव आहे. पथकाचे अंमलदार दत्तात्रेय चकोर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. कृषीनगर जॉगिंग ट्रॅक भागात रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमध्ये बसलेला इसम सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२४ च्या कोलकत्ता विरूध्द दिल्ली या क्रिकेट सामन्यावर बेटींग लावित असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.३) रात्री पोलीसांनी धाव घेतली असता संशयित एमएच १५ जेएच ३०६८ मध्ये बसून मोबाईलच्या माध्यमातून सामन्याचे थेट प्रेक्षपण बघत बेटींग लावतांना मिळून आला.
त्याच्या ताब्यातील मोबाईल रोख रक्कम व कार असा १६ लाख ५० हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून मुद्देमालासह त्यास गंगापूर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत नागरे,,उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड,दिलीप सगळे,दिलीप भोई पोलीस नाईक दत्तात्रेय चकोर,योगेश चव्हाण,भुषण सोनवणे,अंमलदार चारूदत्त निकम,अनिरूध्द येवले, योगेश सानप,भगवान जाधव सुनिल कोल्हे व गणेश वडजे आदींच्या पथकाने केली.