नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नववर्ष स्वागत समिती आणि नाशिक महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांना आजपासून सुरुवात होत आहे. आज संध्याकाळी ६.३० वाजता “अंतर्नाद” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना समर्पित आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंडित प्रसाद खापर्डे असतील. यात नाशिक मधील ७२ गुरुकुलांचे तब्बल १६२१ विद्यार्थी सहभागी होतील. कार्यक्रमात हिंदुस्तानी कथ्थक, भरतनाट्यम, तबला, बासरी, शास्त्रीय गायन आणि सुगम संगीत यांचा एकत्रित अविष्कार सादर केला जाणार आहे. या अंतर्नाद कार्यक्रमाचे प्रमुख निनाद पंचाक्षरी आणि सहप्रमुख केतकी चंद्रात्रे आहेत.
या कार्यक्रमांमुळे नागरिकांमध्ये नववर्षाचे स्वागत करण्याचा उत्साह द्विगुणीत होणार आहे. तरी पाडवा पटांगण (जुने भाजी मार्केट), नारोशंकर मंदिराजवळ, पंचवटी येथे आयोजित करणायत येणाऱ्या या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष शिवाजी बोन्दार्डे, उपाध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांनी केले आहे.