नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीच्या खुल्या गटातील ए डिव्हिजन ची अंतिम फेरी , नाशिक जिमखाना विरुद्ध नासिक क्रिकेट अकादमी – एन सी ए – यांच्यातील सामन्याने संपन्न झाली. अंतिम फेरीच्या सामन्यात नाशिक जिमखानाने अतिशय चुरशीच्या लढतीत एन सी ए वर १ गडी राखून विजय मिळवला.
विशेष लक्षणीय बाब म्हणजे प्रयोजक मेसन ट्रेडर्स गेल्या अनेक वर्षांपासून ही हकीम मर्चंट क्रिकेट स्पर्धा प्रायोजित करीत आहेत. श्री अब्बासभाई मर्चंट व आता श्री शब्बिरभाई मर्चंट ह्यांचे हे कार्य अतिशय अभिनंदनीय व प्रशंसनीय आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित ४ गटातील वरिष्ठ खुल्या गटातील १६ संघात झालेल्या, मर्यादित ५० षटकांच्या एकूण २७ सामन्यांनंतर हि खुल्या गटातील ए डिव्हिजनची स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न आली.
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान गोल्फ क्लब येथे अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी मिळालेल्या नासिक क्रिकेट अकादमी ने ५० षटकांत ९ बाद २८५ धावा केल्या. नाशिक जिमखानाने ४९ षटकांत ९ बाद २९० धावा करत अंतिम सामना जिंकला. योगेश महालेने २२ चेंडूत नाबाद ३३ धावांची विजयी खेळी केली. नाशिक जिमखाना संघास प्रशिक्षक संजय मराठे यांचे मार्गदर्शन लाभले.
संक्षिप्त धावफलक : नासिक क्रिकेट अकादमी – ५० षटकांत ९ बाद २८५ – प्रमोद नारळे ५३, रविंद्र मत्च्या ४८, सारंग धामणे ४४ व गौरव कुलकर्णी नाबाद ४१. नील चंद्रात्रे व विकास वाघमारे प्रत्येकी २ बळी.
वि नाशिक जिमखाना – ५० षटकांत ९ बाद २९० – यासर शेख ७७ , महेश डावरे ५५ , कपिल शिरसाठ ५४ , योगेश महाले नाबाद ३३. जयेश पवार व रविंद्र मत्च्या प्रत्येकी ३ तर विवेक इशरवाल २ बळी
या खुल्या गटातील ए डिव्हिजनच्या हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेत फलंदाजीत मेरी क्रिकेट अकादमीच्या चेतन लोहारने ४ डावात १९२ धावांसह प्रथम स्थान मिळविले. तर गोलंदाजीत नासिक क्रिकेट अकादमीच्या डावखुरा मंदगती विवेक यादवने ४ डावात सर्वाधिक १७ गडी बाद केले. यष्टिरक्षणात नाशिक जिमखानाच्या यश पगारने ५ सामन्यात सर्वाधिक १२ बळी घेतले.