नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज(04 एप्रिल 2024 रोजी) आयआयटी बॉम्बे अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे कर्करोगावरील पहिल्या स्वदेशी जनुकीय उपचारप्रणालीची सुरुवात केली.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की भारताच्या पहिल्या जनुकीय उपचार प्रणालीची सुरुवात ही कर्करोगाविरुध्दच्या आमच्या लढ्यातील मोठी प्रगती आहे. “सीएआर-टी सेल उपचार प्रणाली” असे नाव असलेली ही उपचार पद्धती सुलभतेने तसेच किफायतशीर दरात उपलब्ध होणार असल्याने संपूर्ण मानवजातीसाठी ही उपचार प्रणाली नवी अशा देणारी ठरली आहे. ही उपचारप्रणाली असंख्य कर्करोग ग्रस्तांना नवजीवन देण्यात यशस्वी ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की सीएआर-टी सेल उपचार प्रणाली ही वैद्यकीय शास्त्रातील सर्वात अभूतपूर्व प्रगतीच्या बाबींपैकी एक समजली जाते. विकसित देशांमध्ये काही काळापासून ही प्रणाली उपलब्ध आहे, मात्र ती अत्यंत खर्चिक असल्याने जगभरातील बहुतांश रुग्णांच्या आवाक्याबाहेरील आहे. आज सुरु करण्यात आलेली उपचार प्रणाली ही जगातील सर्वात किफायतशीर सीएआर-टी सेल उपचार प्रणाली आहे हे समजल्यावर त्यांनी आनंद व्यक्त केला.
भारताची ही पहिलीच सीएआर-टी सेल उपचार प्रणाली मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्यातील सहयोगासह आणि इम्युनोॲक्ट या उद्योग क्षेत्रातील भागीदाराच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे हे जाणून घेतल्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आनंद व्यक्त केला. देशातील शिक्षणक्षेत्र आणि उद्योगक्षेत्र यांच्यातील भागीदारीचे हे उत्कृष्ट उदाहरण असून त्यातून अशाच प्रकारच्या प्रयत्नांना प्रेरणा मिळेल अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपती म्हणाल्या की, आयआयटी बॉम्बे ही शिक्षण संस्था केवळ भारतातच नव्हे तर जगभरात तंत्रज्ञान विषयक शिक्षणासाठी आदर्श संस्था म्हणून नावाजलेली आहे. सीएआर-टी सेल उपचार प्रणालीच्या विकसनासाठी केवळ तंत्रज्ञानाचा मानवतेच्या सेवेसाठी वापर करून घेण्यात आला नसून, इतर क्षेत्रातील तसेच उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्थांसोबत भागीदारी देखील करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.आयआयटी बॉम्बे या संस्थेने गेली तीन दशके संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित केल्यामुळेच हे शक्य झाले आहे असे त्या म्हणाल्या.आयआयटी मुंबई आणि अशाच इतर संस्थांमधील, अगदी संपूर्ण भारतातील शिक्षक गण आणि विद्यार्थी यांच्या ज्ञानाचा पाया आणि कौशल्ये यांना आगामी तंत्रज्ञानविषयक क्रांतीचा मोठा लाभ होणार आहे असे मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याप्रसंगी व्यक्त केले.