नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नाशिक शाखेच्या नूतन अध्यक्ष व कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ शनिवार ६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता आयएमए सभागृह, शालिमार, नाशिक येथे संपन्न होणार आहे. नूतन अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पॅथॉलॉजीस्ट डॉ. सुधीर संकलेचा, सचिव डॉ. रविराज खैरनार, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र नेहेते आणि खजिनदार म्हणून डॉ. ललेश नाहाटा हे आपल्या पदाची सूत्रे ग्रहण करतील.
पदग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर हे उपस्थित राहणार असून विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र आयएमए चे अध्यक्ष अमरावती येथील डॉ. दिनेश ठाकरे यांची उपस्थिती लाभणार आहे. आयएमए ही अॅलोपॅथी डॉक्टरांचे प्रतिनिधीत्व करणारी देशपातळीवरील संघटना असून नाशिक शाखेत जवळपास 1800 सदस्यांचा समावेश आहे. नाशिक आयएमएचे शालिमार येथील मुख्यालयात लहान बाळांसाठीचे चॅरीटेबल सविता देसाई बालरूग्णालय चालविते. तसेच म्हसरूळ येथे महाराष्ट्र टीबी सॅनेटोरियम देखील संस्थेतर्फे चालविले जाते. स्वतःचे चॅरीटेबल रूग्णालय चालविणारी नाशिक आयएमए ही भारतातील एकमेव शाखा आहे, अशी माहिती नूतन अध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा यांनी दिली.
यंदाच्या वर्षी सदस्यांसाठी विविध उपक्रम राबविले जाणार असून डॉक्टरांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटना कार्यरत असणार आहे. डॉक्टर आणि रूग्ण यातील सुसंवाद वाढण्याच्यादृष्टीने प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सचिव डॉ. रविराज खैरनार यांनी दिली.