नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांदा निर्यातीवर बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर शेतक-यांमध्ये संताप असतांना आता केंद्र सरकारने काहीसा दिलासा दिला आहे. निर्यात बंदी पूर्ण उठवली नसली तरी संयुक्त अरब अमिरातीला आणखी दहा हजार टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडच्या (एनसीईएल) माध्यमातून कांद्याची निर्यात केली जाणार आहे.
गेल्या काही महिन्यापासून निर्यातबंदीमुळे कांद्याच्या दरात घसरण होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीला अतिरिक्त दहा हजार टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होईल याबाबत संभ्रम आहे.
केंद्र सरकारने आठ डिसेंबर २०२३ रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. ३१ मार्चपर्यंत ही बंदी होती; परंतु नंतर ती वाढवण्यात आली. निवडणुकीच्या काळात कांद्याचे भाव वाढू नयेत, यासाठी सरकाराने ही बंदी कायम ठेवली. शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा देण्यासाठी सरकारने मित्र राष्ट्रात साडेतीन लाख टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारने आतापर्यंत मित्र देशांना ७९ हजार १५० टन कांद्याची निर्यात केली आहे. त्यात आता आणखी १० हजार टन कांद्याची भर पडणार आहे.