नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नरेडको नाशिकच्या नूतन अध्यक्ष सुनील गवादे व पदाधिकारी यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांची भेट घेतली. अतिशय महत्वाच्या अशा विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. महापालिकेत बांधकाम प्रकल्प मंजुरी करतांना येत असलेल्या अडचणी, व्यवसायिक घरपट्टी, वृक्षतोड, म्हाडा नाहरकत पत्र, इतर कार्यालयीन विषय यावर चर्चा करण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी नरेडकोच्या प्रश्नांना उत्तर देतांना सांगितले की महापालिका सर्वसामान्य नागरिक तसेच संस्था, संघटना यांच्या विविध अडचणी यावर सकारात्मक आहे. व्यवसायिक घरपट्टी विषयी महापालिकास्तरावर काम सुरु असून नरेडको नाशिकने यावर अभ्यास करून पूर्ण निवेदन केल्यास याविषयी शासन स्तरावर मार्गदर्शन घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. नाशिकच्या विकासाला वेग व दिशा देण्यास प्राधान्य राहणार आहे.
सिहंस्थ कुंभमेळा २०२७ तसेच बाह्य रिंगरोड यावर प्राथमिक कामे सुरु असून नाशिकच्या एकंदरीत प्रगतीला आवश्यक कामे आचारसंहिता असूनही प्रगतीपथावर आहेत असे आयुक्त मनपा यांनी सांगितले. नरेडको नाशिक तर्फे सुनील गवादे, उदय शाह, शंतनू देशपांडे, भूषण महाजन, प्रशांत पाटील, परेश शाह , राजेंद्र बागड, अभय नेरकर, पवन भगूरकर, भाविक ठक्कर, अश्विन आव्हाड, पुरुषोत्तम देशपांडे, प्रसन्ना सायखेडकर, मुकुंद साबू, विक्रांत जाधव, हर्षल पाटील आदी उपस्थित होते.