गौतम संचेती, इंडिया दर्पण वृत्तसेवा
दिंडोरी लोकसभा मतदार संघातील खासदार डॅा. भारती पवार यांची देशभरातील केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री म्हणून कारकिर्द यशस्वी ठरली असली तरी त्या खासदार म्हणून फेल ठरल्या आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना पहिल्यांदा खासदार होण्याची संधी मिळाली. त्यानंतर कमी वेळातच त्या केंद्रिय मंत्री झाल्या. त्यानंतर त्यांचे मतदार संघाकडे दुर्लक्ष झाले. त्यातच त्यांची पीए संस्कृती सुध्दा त्यांना मारक ठरली. मतदारांबरोबर थेट संपर्क नसल्यामुळे अनेक प्रश्नांची तीव्रता त्यांना समजली नाही. त्यामुळे काही प्रश्न सोडवण्यात त्यांना य़श आले नाही.
दिंडोरी लोकसभा मतदार संघात दिंडोरी, कळवण, चांदवड, निफाड, येवला व नांदगाव हे विधानसभा मतदार संघ आहे. यातील बहुतांश भागात कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतला जातो. या प्रश्नांकडे ज्या तीव्रतेने त्यांनी केंद्राबरोबर संघर्ष करायला हवा तसा तो झाला नाही. राष्ट्रवादीत असतांना त्या थेट रस्त्यावर उतरुन आंदोलन करत होत्या. खासदार झाल्यानंतर सुरुवातील त्यांनी तातडीने हे प्रश्न केंद्रासमोर मांडले. पण, मंत्री झाल्यानंतर त्यांचा तो आक्रमकपणा दिसला नाही. त्यामुळे निर्यातबंदीचा फटका कांदा उत्पादक शेतक-यांना बसला. कांदा प्रश्नांवर काही निर्णय़ केंद्र सरकारने घेतले. पण, त्यात डॅा. भारती पवार यांचा वाटा कमीच होता.
कांदा प्रश्नाबरोबरच नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड या रेल्वे स्टेशन जवळील अनेक गावांचे प्रश्न हे रेल्वेशी संबधीत आहे. ते प्रश्न मात्र पाच वर्षात सुटण्यापेक्षा अधिक वाढले. अनेक गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले. तर काही गाड्यांना मनमाड रेल्वे स्थानकावर थांबे मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाही. काही प्रश्नांवर त्यांनी फक्त रेल्वेमंत्र्यांना निवेदन दिले. पण, प्रश्न सुटला नाही. रेल्वेच्या चाकरमान्यांच्या अनेक प्रश्नांकडेही त्यांचे दुर्लक्ष झाले. त्याचबरोबर मनमाडच्या काही गाड्या थेट पळवल्या गेल्या. तर काही गाड्या या दुस-या स्थानकावरुन धावणार आहे. यासाऱखे अनेक प्रश्न आहे. पण, ते सुटले नाही. रेल्वे स्थानकाचे नुतणीकरण, रेल्वे लाईनचे प्रश्न सुटले असले तरी रेल्वेत अशी कामे निरंतर चालु असतात. त्यात वेगळे काही नाही. एकुणच रेल्वे प्रश्नाबाबत त्यांची भूमिका नेहमी वरवरची राहिली त्यांनी अभ्यास करून काही मागण्या केल्या असत्या तर मंत्री म्हणून त्यांना यश आले असते.
केंद्रात मंत्री असतांना आपल्या मतदार संघात एखादा मोठा प्रकल्प आणून रोजगार उपलब्ध करुन देण्यातही त्यांना य़श मिळाले नाही. त्यांच्या कारकिर्दीत एकही मोठा प्रकल्प आला नाही. ते त्यांना आणणे शक्य होते. केंद्राच्या योजना राबविण्यात त्यांची कोणतीही यंत्रणा दिसली नाही. या प्रश्नांबरोबरच मतदार संघात पक्ष वाढवण्याचे फारसे काम केलेले दिसत नाही. त्यामुळे इतर पक्षांच्या कुबड्या घेऊनच यावेळेस दिंडोरी त्यांना लढावे लागणार आहे.
जिल्हा परिषद सदस्य असतांना एखाद्या कामाचा पाठपुरावा ते थेट प्रत्यक्ष उपस्थितीत राहून करायच्या. पण, खासदार व मंत्री झाल्यानंतर त्यांचा तो बाणा मतदार संघाच्या बाबतीच कमी झाला. त्यांच्याशी संबधीत असलेल्या आरोग्य विभागाशी संबधीत अनेक प्रश्न त्यांच्या लोकसभा मतदार संघात आहे. पण, त्यांना त्यातही फारसे काही करता आले नाही. राज्य सरकारकडे बोट दाखवून त्यांनी वेळ मारुन नेण्याचे काम केले असले तरी सामान्यांना मात्र त्यातून दिलासा मिळाला नाही. कोविड काळात मात्र त्या मतदार संघात फिरल्या. त्यातून काही दिलासा मतदारांना मिळाला होता.
खरं तर खासदार म्हणून त्या फेल ठरल्या असल्या तरी मोदी सरकारमध्ये देशपातळीवर विविध कामे करतांना त्यांनी आपले वेगळेपण सिध्द केले. पहिल्यांदा मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी ताकदीने ते सांभाळले. भाजपसाठी त्यांनी देशभर अनेक उपक्रमातही सहभाग घेतला. त्यामुळे एकीकडे देशपातळीवर य़शस्वी ठरलेल्या डॅाक्टर भारती पवार या मतदार संघात मात्र फेल ठरल्या. आता त्या निवडणकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे त्यांच्या एकुणच कामाचा तुलनात्मक विचार करुन त्यांना मतदार पुन्हा दिल्लीला पाठवतात की त्यांच्यावरचा राग ते मतपेटीतून दाखवतात हे सर्व मतदानानंतर पुढे येणार आहे. तोपर्यंत आपण त्यांना शुभेच्छा देऊ या….