इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बंगळूरः म्हैसूर येथील एका व्यक्तीने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींसमोर गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे न्यायालयात गोंधळ उडाला. २०२१ मध्ये म्हैसूर येथे हैदराबादच्या बांधकाम कंपनीविरुद्ध दाखल करण्यात आलेला खटला न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे हा व्यक्ती नाराज होता. त्यामुळे त्याने असे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
एस चिन्नम श्रीनिवास असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-या व्यक्तीचे नाव आहे. त्याला बॉरिंग हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एनव्ही अंजारिया आणि न्यायमूर्ती एचबी प्रभाकर शास्त्री यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू असताना त्याने गळा कापण्याचा प्रयत्न केला. दरम्यान श्रीनिवास यांच्या पत्नी उमा देवी यांनी पोलिसांना सांगितले की, तिचा पती एवढे कठोर पाऊल उचलेल, याची तिला काहीच कल्पना नव्हती.
नेमकं घडलं काय
सुनावणीसाठी एस चिन्नम श्रीनिवास कोर्ट रूममध्ये गेला. त्याने काही फाईल्स अधिकाऱ्याला दिल्या. त्यावेळेस त्याची बडबड सुरू होती. त्यावेळेस अधिकाऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने चाकू काढून स्वतःचा गळा कापून आत्महत्या करण्याा प्रयत्न केला. या घटनेनंतर न्यायालयाने कक्षाबाहेर उपस्थित असलेल्या पोलिसांना सांगून त्याला रुग्णालयात न्यायाला लावले.