नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात राहणा-या २३ वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयुर सुनिल गांगुर्डे (रा.अवनी रो हाऊस,तुळजा भवानी मंदिराजवळ श्रमिकनगर ) असे मृत युवकाचे नाव आहे. मयुर गांगुर्डे याने मंगळवारी (दि.२) रात्री अज्ञात करणातून आपल्या राहत्या घरात छताच्या लोखंडी कडीस दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांना त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार वाघमारे करीत आहेत.
अल्पवयीन तलवारधारी पोलीसांच्या जाळयात
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धारदार तलवारीचा धाक दाखवित दहशत माजविणारा अल्पवयीन तलवारधारी पोलीसांच्या जाळयात अडकला आहे. जुने नाशिक परिसरातील नानावली भागात पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातून लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नानावलीतील सुलभ शौचालय परिसरात मंगळवारी (दि.२) दुपारच्या सुमारास एक तरूण तलवारीचा धाक दाखवित दहशत माजवित असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी धाव घेतली असता १७ वर्षीय अल्पवयीन संशयित मिळून आला. त्याच्या अंगझडतीत धारदार तलवार मिळून आल्याने पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले असून अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत. याबाबत पोलीस नाईक संजय पगार यांनी फिर्याद दिली आहे.