नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचवटीतील नागचौक भागात रिक्षातून आलेल्या टोळक्याने अंडारोलचा व्यवसाय करणा-या तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. घराबाहेर बोलावून घेत टोळक्याने हा हल्ला केला असून या घटनेत कोयता आणि चॉपरचा वापर करण्यात आल्याने युवक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश साळवे,विक्की शिंदे,अभि व रिक्षाचालक युवक अशी हल्ला करणाºया संशयितांची नावे आहेत. याबाबत आकाश संजय जाधव (२६ रा.घर नं.४२१२ नागचौक,पंचवटी) या तरूणाने फिर्याद दिली आहे. जाधव याचा अंडारोल विक्रीचा व्यवसाय असून मंगळवारी (दि.२) रात्री व्यवसायाचे कामकाज आटोपून घरी पोहचला असता ही घटना घडली. रिक्षातून आलेल्या टोळक्याने त्यास आवाज देवून घराबाहेर बोलावून घेत हा हल्ला केला. घराबाहेर आलेल्या जाधव यास संशयित गणेश साळवे याने तुला जास्त झाले आहे का ? तू मयुर साबळेचा मित्र आहे का, पोलीसांना आमची घरे दाखवतो असा जाब विचारत टोळक्याने त्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली.
यावेळी विकी शिंदे याने जाधव याचे हात पकडून ठेवले असता साळवेने रिक्षातील कोयता काढून तर अभि नामक युवकाने चॉपरने त्याच्यावर वार केले. या घटनेत आकाश जाधव जखमी झाला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक विलास पडोळकर करीत आहेत.