वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
काही दिवसांपूर्वीच झी मराठी वाहिनीवरून ‘चला हवा येऊ द्या’या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल व त्यातून निलेश साबळेने एक्झिट घेतली होती. डॉ. निलेश साबळेने हा शो सोडल्यानंतर बर्याच चर्चा झाल्या. मात्र, आजारपण आणि इतर काही कारणांनी शो सोडला असल्याचे निलेश साबळे यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता निलेश साबळे पुन्हा एकदा नवा कॉमेडी शो घेऊन येत आहे.
निलेश साबळे “हसताय ना ? हसायलाच पाहिजे!! हा नवा शो घेऊन येणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर हा शो २० एप्रिल पासून सुरू होणार आहे. आणि यामध्ये कलाकार ही वेगळे असणार आहेत.निलेश साबळे यांनी त्यांच्या विनोदाच्या वेगळ्या शैलीमुळे अवघ्या महाराष्ट्राला हसवले.आणि केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात त्यांनी त्यांचे चाहते निर्माण केलेले आहेत . भाऊ कदमने निखळ विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले, तसेच ओंकार भोजनेही आपल्या वेगळ्या पद्धतीने विनोद करून प्रेक्षकांचा लाडका झाला. हे तिनही विनोदवीर एकत्र येऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. त्यामुळे प्रेक्षक खळखळून हसण्यासाठी 20 एप्रिल ची आतुरतेने वाट पाहत आहेत.
निलेश साबळेबरोबरच भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे विनोदवीर शो मध्ये सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन डॉ. निलेश साबळे यांचं असणार असून,यात भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण इ. कलाकारांचा समावेश आहे.
या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलका कुबल आठल्ये हे दोन सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी प्रत्येक एपिसोडमध्ये असणार आहेत.”हसताय ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!! हा कॉमेडी शो २० एप्रिल पासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे.