इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काँग्रेस नेते व माजी खासदार संजय निरुपम यांना आज पार्टीतून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव आज दिल्ली हायकमांडला पाठवला आहे. आता त्यांच्यावर दिल्लीतच कारवाई करण्याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. त्यांचे नाव स्टार प्रचारक यादीतून देखील हटवण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
टिळक भवन येथे काँग्रेसच्या प्रचार समिती आणि समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती पटोले यांनी दिली.
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, प्रचार समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पब्लिसिटी कमिटीचे अध्यक्ष विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री अस्लम शेख, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेते, समित्यांचे सदस्य उपस्थित आहेत.