पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने ‘महा स्पीडस्टार: शोध महावेगाचा’ ही मोहीम हाती घेतली होती. राज्यातल्या कानाकोपऱ्यात दडलेल्या वेगवान गोलंदाजांचा शोध घेणाऱ्या या मोहिमेअंतर्गत एमसीएलाग वेगवान गोलंदाजांना शोधण्यात यश आले असून यांच्यातून महाराष्ट्राला आणि देशाला आता वेगवान गोलंदाज मिळणार आहेत.
९ मार्च ते ३१ मार्च दरम्यान महाराष्ट्राच्या नाशिक (उत्तर विभाग), छ. संभाजीनगर (मध्य विभाग), नांदेड (पूर्व विभाग), सोलापूर (दक्षिण विभाग) आणि पुणे (पश्चिम विभाग) अशा पाच विभागात झालेल्या या स्पर्धेत हजारो खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेची अंतिम फेरी ३१ मार्च, २०२४ रोजी एमसीएच्या पुण्यातील गहुंजे येथील स्टेडियममध्ये पार पडली. या स्पर्धेत पुरुष व महिलांच्या ज्युनियर व सीनियर गटात खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रत्येक गटात विजयी झालेल्या खेळाडूंची नावे:
१) सिनियर पुरुष: विश्वजीत ठाकुर (रायगड), १४०किमी/तास
२) ज्युनिअर पुरुष (U19): हर्षल मिश्रा, १३२किमी/तास
३) ज्युनियर पुरुष: (U16): सार्थक चाबिलवाड, १२७किमी/तास
४) ज्युनियर पुरुष (U14): रुद्रांश तापारे, ११७किमी/तास
५) सिनियर महिला: ईशा घुले, १०३किमी/तास
६) ज्युनिअर महिला: निकिता सिंग, १०९किमी/तास
या उपक्रमाविषयी बोलताना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहितदादा पवार म्हणाले, “मी या स्पर्धेत विजयी झालेल्या तसेच विविध जिल्ह्यांमधून सहभागी झालेल्या हजारो खेळाडूंचे मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्राच्या तळागाळात जाऊन आम्हाला हे हिरे सापडले, या गोष्टीचा मनस्वी आनंद होत आहे. या स्पर्धेतील विजेत्या गोलंदाजांसह स्पर्धेतील इतर वेगवान गोलंदाजांना, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने वर्षभर मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सर्व अपेक्स कमिटी मेंबर्स, महा स्पीडस्टार टीम, रेफ्री, प्रशिक्षक, अंपायर्स व आमच्या सर्व जिल्हा क्रिकेट असोसिएशन्स या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांचे मी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने आभार मानतो. गुणवान खेळाडूंना संधी देणारे असे अनेक उपक्रम भविष्यात हाती घेतले जाणार असून अशा तळागाळात दडलेल्या हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.