इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगाव लोकसभा मतदार संघात तिकीट कापल्यामुळे नाराज असलेले खासदार उन्मेश पाटील यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्या समर्थकांसह त्यांनी शिवबंधन बांधून मशाल हाती घेतली. यावेळी मातोश्री परिसरात एकच जल्लोष करण्यात आला. सत्ताधारी विद्यमान भाजप खासदारांचे पक्षांतर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
काल त्यांनी खा.संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर उदया शिवसेना ठाकरे गटात ते प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. ते आज खरे ठरले.
जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यामुळे पाटील नाराज होते. काल भाजपने उन्मेश पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे यांनी उन्मेश पाटील यांना फोन करत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांची समजूत काही भाजपला काढता आली नाही. त्यामुळे त्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला.
हा प्रवेश करत असतांना त्यांनी आपल्या खासदारकी पदाचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांना ईमेलवरुन पाठवला. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे.