इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघाचा तिढा मंगळवारीही सुटला नाही. तातडीने खासदार हेमंत गोडसे. मंत्री छगन भुजबळ मुंबईला गेले. त्यानंतर यवतमाळ दौरा अर्धवट सोडून पालकमंत्री दादा भुसेही पोहचले. पण, उमेदवारी कोणाला याचे उत्तर मिळालेच नाही. आता दोन ते तीन दिवसात या जागेवरचे चित्र स्पष्ट होईल असे खा. गोडसे यांनीच सांगितले. मग नेमकं बैठकीत काय घडलं हे मात्र कोणीच सांगितलं नाही.
महायुतीत ७ विधानसभा मतदार संघाचा तिढा आहे. त्यात शिवसेना शिंदे गटाला मिळालेल्या काही मतदार संघाचाही समावेश आहे. त्यामुळे हे जागा वाटपाचे घोडे अडले आहे. नाशिकची जागा विद्यमान खासदारांना मिळावी यासाठी शिंदे गट आग्रही असला तरी ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे येथे छगन भुजबळ यांचे नाव निश्चित झाल्याचे जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात होते. पण, त्याची घोषणा नाही. त्यामुळे या जागेवर अद्याप गु-हाळ सुरु आहे.
दुसरीकडे भाजपने आमचे आमदार जास्त व नगरसेवकांची संख्या या मतदार संघात जास्त असल्याचे कारण पुढे करत या जागेवर दावा केला आहे. पण, हाच निकष दिंडोरी लोकसभा मतदार संघाबाबत लावला तर येथे भाजपचा एकच आमदार आहे. नगरसेवकांची संख्याही इतर पक्षाच्या तुलनेत एकदमच कमी आहे. तरी येथे भाजपाल जागा मिळाली.
त्यामुळे महायुतीचे प्रत्येक घटक पक्षाचे दावे वेगवेगळे असले तरी ही जागा नेमकी कोणाला मिळाली हे मात्र अद्याप निश्चित झाले की नाही हे मात्र कोणीच उघड बोलत नाही. जो तो आपला दावा करत आहे.