पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यातील ससून रुग्णालय वेगवेगळ्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. आता अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या तरुणाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सागर रेणूसे असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे नातेवाइकांनी संताप व्यक्त केला.
सागर रेणूसे या तरुणाला पुण्यातील भोर तालुक्यात अपघात झाला होता. त्याला १६ मार्चला ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. २६ तारखेला त्याची प्रकृती खालावली. त्याच्या कारणाचा शोध घेतला, तेव्हा उंदीर चावल्याचे निष्पन्न झाले. हे समजल्याने नातेवाइकांनी चांगलाच गोंधळ घातला. त्याच्या डोक्याला, कानाला आणि इतर अवयवांना उंदराने चावा घेतला. त्यानंतर या तरुणाची प्रकृती खालावून आज सकाळी त्याचे निधन झाले.
सागर याचे निधन झाल्यावर नातेवाइकांनी उंदीर चावल्याचा आरोप केला; परंतु डॉक्टरांनी ते नाकारले होते. त्यानंतर डॉक्टरांनी उंदीर चावल्याच मान्य केले. त्यामुळे नातेवाइक चांगलेच आक्रमक झाले होते. सागर रेणुसेचा अपघात झाला. त्यातून योग्य उपचार होऊन सागर बरा होईल, अशी आशा नातेवाइकांना अपेक्षा होती. पण, या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली.