इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –
भारतात सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका या सामन्यात अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलियाने श्रीलंका संघावर मात करून आपल्या विजयाचे खाते उघडले आहे. आज लखनऊ येथे झालेल्या या दोन्ही संघांमधील सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५ गडी आणि ८८ चेंडू राखून विजय संपादन केला. श्रीलंकेने दिलेल्या २०९ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात देखील निराशाजनक झाली होती. श्रीलंकेचा युवा गोलंदाज दिलशान मदुशंका याच्या एका फसव्या चेंडूवर मातब्बर समजला जाणारा डेव्हिड वॉर्नर पायचित झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथ सारखा दादा खेळाडू देखील मदुशंकाच्या जाळ्यात अडकल्यामुळे काही क्षणभरासाठी ऑस्ट्रेलियाच्या गोटातत चिंतेत होती. परंतु एकीकडून मिशेल मार्श (५२), मार्नस लाबूशेन (४०) जोश इंग्लिस (५८)आणि ग्लेन मॅक्सवेल (३१) यांनी आपापली जबाबदारी उचलून ऑस्ट्रेलियाचा विजयी रथ पुढे नेला आणि ३६ व्या षटकात ५ बाद २१५ धावा करुन सामना जिंकला. या सामन्यात मधु शंका खेरीज एकही श्रीलंकन गोलंदाजाला विकेट न मिळाल्याने श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडीसला या सामन्यात विजयाचे आव्हान पेलणे करणे अतिशय जड गेले.
या स्पर्धेच्या विजेतेपदाच्या शर्यतीत फेव्हरिट मानला जाणारा ऑस्ट्रेलिया संघ, २ सामने खेळून सुद्धा एकाही सामन्यात विजयी होऊ न शकल्याने गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर जाऊन बसला होता. परंतु, श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात कागारुंना आता विजयाचा सूर गवसल्यामुळे पुढच्या सगळ्या लढतीमध्ये हा संघ फार्मात येईल अशी आशा चाहत्यांना वाटू लागली आहे.
आजच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली. श्रीलंकेची पहिली विकेट १२५ धावांवर पडल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय योग्य दिशेने जात होता. परंतु, सलामीवीर पथूम निसांका ६१ धावांवर बाद झाल्यानंतर पुढे जणू काही या संघात स्पेशलिस्ट फलंदाजच नाहीत,अशी परिस्थिती निर्माण झाली आणि पुढे मग अवघ्या २०९ या धावसंख्येवर ४३.३ षटकात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा डाव संपवून लावला. २२ व्या षटकात निसांकाची पडलेली विकेट आणि त्यानंतर २७ व्या षटकात कुसल परेराची पडलेली विकेट हे या डावाचे टर्निंग पॉईंट ठरले. विशेष म्हणजे, हे दोन्ही बळी कर्णधार पँट कमिन्सला मिळाले. ॲडम झांपाने ८ षटकात ४ बळी घेऊन आणि मिशेल स्टार्क ने १० षटकात २ बळी घेऊन उर्वरित काम पूर्ण केले आणि मोठी धावसंख्या उभारण्याचे श्रीलंकेचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
१९९६ साली याच श्रीलंकेने अर्जुन रणतुंगा यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाचा आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव करून विजेतेपद पटकावले होते. मात्र त्यानंतर,आज पावेतो कुठल्याही विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकता आलेला नाही.
उद्या दक्षिण आफ्रिकेचा सामना नेदरलँड सोबत हिमाचल प्रदेश क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर धरमशाला येथे खेळला जाईल.