नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळय़ा भागात तीन महिलांचा विनयभंग करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहे. याप्रकरणी पंचवटी भद्रकाली व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . पहिली घटना भद्रकालीतील दखणीपूरा भागात घडली. अब्दूल लतीफ यासीन कोकणी (रा.घर नं.२५८३ दखणीपूरा,भद्रकाली) या पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराने सोमवारी (दि.१) पीडित महिलेच्या पतीस मारहाण केली. यावेळी महिला पतीच्या बचावासाठी गेली असता संशयिताने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अंकोलीकर करीत आहेत.
दुसरा प्रकार डावखरवाडीत घडला. दोघा घरमालकांनी भाडेकरू महिलेचा विनयभंग केला. विवेक पोपटराव गायकवाड व विशाल पोपटराव गायकवाड अशी संशयित घरमालकांची नावे आहेत. डावखरवाडी भागात राहणारी पीडित महिला संशयितांच्या घरात भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहे. संशयितांनी २८ फेब्रुवारी रोजी महिलेचे घर गाठून दरवाजावर लाकडी दांड्याने व फावड्याने मारून महिलेस अश्लिल शिवीगाळ केली. यानंतर महिला व तिचा भाऊ पार्किंगमधून दुचाकी काढत असतांना संशयितांनी तू आमच्या विरोधात पोलीसात तक्रार देते का असे म्हणत भावास मारहाण केली तसेच दमदाटी करीत महिलेचा विनयभंग केला. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक बोडके करीत आहेत.
विनयभंगाचा तिसरा प्रकार पंचवटीतील संजयनगर भागात घडला. भावास मारहाण करीत एकाने भावजयीचा विनयभंग केला. पत्नीस मारहाण करणा-या मोठ्या भावास समजवून सांगत असतांना संशयिताने आपल्या आईसह लहान भाऊ भावजयीस शिवीगाळ करीत भावास मारहाण केली. या घटनेत पीडिता आपल्या पतीच्या बचावासाठी गेली असता संशयिताने तिचा विनयभंग केला. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.