इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला ७ जागेवर पाठींबा देण्याचा निर्णय घेतलेला असतांना काँग्रेसने मात्र त्यांच्या विरोधात अकोला लोकसभा मतदारसंघात उमेदवाराची घोषणा केली. आज काँग्रेसने डॉ. अभय पाटील यांचे नाव जाहीर करुन धक्का दिला. विशेष म्हणजे उमेदवारी दाखल करण्यासाठी दोन दिवस उरले असताना काँग्रेसने अभय पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे.
या मतदार संघात भाजपने अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर हे येथून निवडणूक रिंगणात आहे. आता डॅा.अभय पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे येथे तिरंगी लढत होणार आहे.
या मतदारसंघात प्रत्येक वेळी काँग्रेस आणि वंचितमध्ये मतविभाजन होऊन भाजपचा विजय झाला. गेल्या चार निवडणुकांमध्ये हाच अनुभव असल्यामुळे वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडी एकत्र लढणार, असे मानले जात होते. परंतु इथे काँग्रेसने उमेदवार देऊन अकोल्यात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान या निवडणुकीत माघारीपर्यंत संधी आहे. त्यामुळे काँग्रेस काय निर्णय घेतो हे महत्त्वाचे आहे.