जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जळगाव जिल्ह्यातील टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जिथे टंचाई अशा भागात, आदिवासी भागात मनरेगाची अधिकाधिक कामे सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची, जनवारांच्या पाण्याची, चाऱ्याची सोय यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत जबाबदारीने देखरेख करावी असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
आज राज्याचे मुख्यसचिव नितीन करीर यांनी दृश्य प्रणालीद्वारे राज्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अपर मुख्य सचिव (महसुल), अपर मुख्य सचिव (जलसंपदा), अपर मुख्य सचिव (वित्त), प्रधान सचिव (पाणी पुरवठा), प्रधान सचिव (रोहयो), प्रधान सचिव (ग्राम विकास), सचिव (पदुम), सचिव (कृषि) उपस्थित होते.
या बैठकीत दिलेल्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यातील टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मनरेगाची कामं सुरु असून ते अधिक मोठ्या प्रमाणात सुरु करण्याची सूचना देण्यात आली असून जिल्ह्यातील पाण्याचे अधिकाधिक स्रोत तपासण्याचे आदेश भूजल सर्वेक्षण अधिकारी पाहतील, तर जिल्ह्यातील गोठा तसेच शेळीचे शेड तपासून त्यांना योग्य तो चारा उपलब्ध आहे का नाही याची खात्री पशु संवर्धन विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी करतील.
या टंचाईच्या काळात पिण्याच्या पाण्याची, जनवाराच्या पाण्याची तसेच चाऱ्याची सोय होईल यावर जिल्हा प्रशासनाचे लक्ष असेल असे सांगून कोणाला टंचाई काळात अडचण येऊ नये यासाठी हेल्प लाईन नंबर सुरु करण्यात आला आहे. तो क्रमांक 0257 -2217193 असा आहे, टंचाई संदर्भात कोणतीही तक्रार असेल तर या क्रमांकावर करावी असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.