नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक या दोन लोकसभा मतदार संघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे यासाठी विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील 12 महिला मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रांचे सर्व संचालन हे महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हातात असणार आहे.
नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार संघात प्रत्येकी सहा मतदारसंघाचा समावेश आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तर रामटेक या लोकसभा मतदारसंघात काटोल,सावनेर, हिंगणा, उमरेड, कामठी, रामटेक विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या सर्वच विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला मतदान केंद्र असणार आहेत.
मतदान केंद्रातील मतदान केंद्राध्यक्ष ते मतदान अधिकारी असा निवडणूकशी संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्ग हा महिला असणार आहे. काटोल विधानसभा मतदार संघातील काटोल हायस्कुल काटोल खोली क्र.3, सावनेर विधानसभा मतदारसंघातील नगर परिषद सुभाष हिंदी प्राथमिक शाळा, खोली क्र. 7 सावनेर हिंगणा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, इसासनी खोली क्र.7, उमरेड विधानसभा मतदारसंघातील पंचायत समिती कार्यालय, उमरेड सहायक गटविकास अधिकारी यांचे कक्ष, नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातील मिलिंद प्राथमिक शाळा, खोली क्र.1, उंटखाना, नागपूर दक्षिण येथील वंदे मातरम विद्यालय, अवधूत नगर, खोली क्र.3 हे महिला केंद्रे, नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातील के.डी.के. कॉलेज, खोली क्र.1 ग्रेट नाग रोड नंदनवन, नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातील बाबा नानक सिंधी हिंदी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, जुनी मंगळवारी हे केंद्र, नागपूर पश्चिम मतदारसंघातील हैदराबाद हाऊस, सिव्हिल लाईन्स नागपूर, बराक क्र.1, खोली क्र.1 हे केंद्र, नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील विनीयालय हायस्कुल, मार्टीन नगर हे केंद्र, कामठी विधानसभा मतदारसंघातील दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी खोली क्र. 1 हे केंद्र आणि रामटेक विधानसभा मतदारसंघातील श्रीराम विद्यालय, खोली क्र.3 रामटेक या केंद्रांचा समावेश आहे.
ज्या मतदान केंद्रात पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त असते, अशा ठिकाणी साधारणतः महिला मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. जास्तीत जास्त महिलांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत मतदानाचा हक्क बजावावा, हाच या केंद्रांच्या निर्मितीमागील उद्देश आहे. अधिकाधिक मतदारांनी मतदान करीत जिल्ह्याचे मिशन डिस्टींक्शन यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले आहे.