इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगावः लोकसभा निवडणुकीमुळे जळगामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच भाजपत स्वगृही परतणार असल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या चर्चेला त्यांच्या निकटवर्तीयांनी दुजोरा दिला आहे. खडसे अचानक दिल्लीला रवाना झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पवार यांनी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर खडसे यांनी शरद पवारांसोबतच राहणे पसंत केले. पण, लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांच्या सून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यामुळे खडसे यांच्या अडचण झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून सुनेचा प्रचार करणे शक्य नाही. त्यामुळे खडसे यांनी भाजपत परतण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते खडसे अचानक दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त लवकरच ठरवला जाण्याची शक्यता आहे. रक्षा खडसे यांनी स्वगृही परतण्याचे आवाहन केले होते. खडसे यांचा भाजप प्रवेश हा वरिष्ठ पातळीवरील निर्णय आहे, असे त्या म्हणाल्या होत्या. याअगोदर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडून भाजपमध्ये परतण्याची ऑफर असल्याचे खडसे यांनी सांगितले होते. ते आता खरे ठरणार आहे.