नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तलवारीचा धाक दाखवून परिसरात दहशत माजविणा-या तरुणाला पोलीसांनी गजाआड केले आहे. संशयिताच्या ताब्यातून लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली असून याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार मोईन रऊफ बुखारी (रा.मिठाई स्ट्रीट दे.कॅम्प) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. बुखारी रविवारी (दि.३१) दुपारच्या सुमारास परिसरात नागरीकांना तलवारीचा धाक दाखवत दहशत माजवित असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पथकाने धाव घेत संशयितास ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यात तलवार मिळून आली. याबाबत अंमलदार सुभाष जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.
किरकोळ भांडणाच्या वादातून परप्रांतीयांवर प्राणघातक हल्ला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड लिंकरोड भागात किरकोळ भांडणाच्या वादातून परप्रांतीय दोघा भावांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत लोखंडी पाईपचा वापर करण्यात आल्याने दोघे बंधू गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्रिकुटाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील एकास अटक करण्यात आली आहे.
अख्तर आलम खान असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याचे वसीउल्ला खान व अन्य साथीदार अद्याप फरार आहेत. याबाबत इकरार अली निजामुद्दीन अली (मुळ रा.उत्तरप्रदेश हल्ली विराटनगर,अंबड लिंकरोड ) या युवकाने फिर्याद दिली आहे. इकरार अली व त्याचा भाऊ मुमताज अली उर्फ इम्पीयाज अली हे दोघे शनिवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास अन्वर किराणा दुकानासमोरील निसार यांचे पानटपरीजवळ उभे असतांना संशयितांनी त्यांना गाठले. यावेळी संशयितांनी मागील भांडणाची कुरापत काढून दोघा भावांना लोखंडी पाईपाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक धुनावत करीत आहेत.
४२ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेवगेदारणा ता.जि.नाशिक येथील ४२ वर्षीय व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शरद कारभारी कासार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कासार यांनी शनिवारी (दि.३०) सायंकाळी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताची चुलत भाऊ स्वप्नील पाटील यांनी त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ धाडीवाल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.