नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ पथकाने दोन जणांना गजाआड करुन नाशिकमधून गुजरात य़ेथे बेकायदा जाणारी दारू ट्रकसह पकडली आहे. या कारवाईत ८ लाख ७७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशिकमधून गुजरात राज्यात बेकायदा दारू पुरवठा होत असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ पथकाच्या मिळाल्यानंतर विदेशी दारूने भरलेला मालट्रक भिमनगर येथे पकडला.
सुनिल नटवर राणा (४५) व चंद्रेश भिकाभाई पटेल (३२ रा. दोघे पादरा जि.बडोदा) अशी मद्याची वाहतूक करणा-या संशयितांची नावे आहेत. नाशिकमधून गुजरात राज्यात दारूचा बेकायदा पुरवठा होत असल्याची माहिती युनिटचे हवालदार शंकर काळे यांना मिळाली होती. नाशिकरोड परिसरातून मद्याने भरलेला मालट्रक रवाना झाल्याची माहिती पोलीसांना मिळताच रविवारी (दि.३१) पथकाने सापळा लावला होता. जेलरोड परिसर पिंजून पथकाने भिमनगर येथे जीजे ०६ एटी ६४७३ मालट्रक अडवून तपासणी केली असता त्यात विदेशी दारूचा साठा आढळून आला.
या कारवाईत ट्रकसह मद्यसाठा असा सुमारे ८ लाख ७७ हजार ३६० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत नाशिकरोड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक काळे करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन जाधव, हवालदार शंकर काळे, विलास गांगुर्डे,गुलाब सोनार,संजय सानप,नंदकुमार नांदुर्डीकर,सुनिल आहेर,चंद्रकांत गवळी,विशाल पाटील,परमेश्वर दराडे,संजय पोटींदे व मधुकर साबळे आदींच्या पथकाने केली.