इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
साताराः सातारा लोकसभा मतदार संघात भाजपने छत्रपती उद्ययनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादीने त्यांच्या विरोधात सक्षम उमेदवार उभे करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना या ठिकाणी उभे करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यासाठी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पृथ्वीराज चव्हाण यांच्यात आज बंद खोलीत चर्चा झाली. त्यात उमेदवारीबाबत निर्णय झाल्याचे बोलले जात आहे.
या बैठकीत सातारा लोकसभा मतदारसंघातील घडामोडींवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद रंगला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीमुळे निवडणूक लढवायला नकार दिला आहे. त्यामुळे कोण निवडणूक लढवणार याची चर्चा रंगली आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी साताऱ्याचा दौरा केला. त्यांनी उमेदवारीबाबत काहीच सांगितले नसले, तरी बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे आणि सत्यजीत पाटणकर आणि या नावांची चर्चा सुरू होती. पण, रविवारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत निर्णय झाल्याचे बोलले जात आहे.
साता-यात जर पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली तर ते काँग्रेस की राष्ट्रवादीकडून उभे राहणार याचीही आता चर्चा रंगली आहे. दरम्यान सातारा काँग्रेसला व भिवंडी राष्ट्रवादीला द्यावा असा फॅार्म्यूला ठरला असल्याचे बोलले जात आहे.