अहमदनगर (इंडिया दर्पण सेवा)- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी , अहमदनगर यांच्या निर्देशानुसार अहमदनगर-शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 मध्ये मतदार जनजागृतीसाठी अशोक कडूस (स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी-माध्य.जि.प.अहमदनगर) यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील समस्त शाळांमध्ये मतदार जनजागृतीच्या विविध उपक्रमांचा “हम भारत के मतदाता है-उत्सव 100 टक्के मतदानाचा”हा महोत्सव 1 ते 3 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये साजरा होणार असून भारत निवडणूक आयोगाच्या- मे भारत हो हम भारत के मतदाता है व मुख्य निवडणूक अधिकारी-महाराष्ट्र द्वारा प्रकाशित झालेल्या -ये पुढे मतदान कर लोकशाहीचा सन्मान कर ही दोन गीते जिल्ह्यातील हजारो शाळांमधून समूहगीत गायनाच्याद्वारे लाखो विद्यार्थी म्हणणार आहेत. मतदार जनजागृतीच्या अधिकृत गीतांद्वारे स्वीप मोहीम जनमानसामध्ये पोहोचवण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे, असे प्रतिपादन अशोक कडूस यांनी केले.
महोत्सवाचे नियोजन पुढील प्रमाणे-1) सोमवार दि.1एप्रिल 2024 -सामूहिक गीतगायन-भारत निवडणूक आयोग द्वारा प्रकाशित मतदार साक्षरता गीत-मैं भारत हुँ -हम भारत के मतदाता है 2)मंगळवार दि. 2 एप्रिल 2024-सामूहिक गीत गायन-मुख्य निवडणूक अधिकारी-महाराष्ट्र द्वारा प्रकाशित महाराष्ट्राचे पहिले निवडणूक गीत-ये पुढे ..मतदान कर 3)बुधवार दि. 3 एप्रिल 2024 -संकल्प पत्र लेखन
वरील दोन्ही गीते परिपाठावेळी/मैदानावर / वर्गावर्गांमधून शक्य झाल्यास माइक / स्पीकरवर ऐकवून तयारी करवून घेऊन विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतली जाणार आहेत.वरील दोन्ही गीतांच्या चालीसाठी सदर व्हिडिओच्या लिंक क्यू आर कोड स्वरूपात वितरित आलेल्या आहेत.संकल्पपत्रे विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून भरून घेतली जाणार आहेत. वरील कालावधीत सर्व उपक्रम शाळेमध्ये आयोजित करावयाचे असून सर्व उपक्रमांचे सर्व फोटो -व्हिडिओ/शूटिंग ,विविध लिंक्स ,वृत्तपत्रांची कात्रणे यांचा अहवाल 8 एप्रिल 2024 पर्यंत 9002 10 9003 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवण्याचे आवाहन जिल्हा स्वीप समितीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर शाळेचे/ शिक्षकांचे यूट्यूब चॅनेल अथवा सोशल मीडिया अकाउंट असल्यास त्यावर आपले वरील विविध उपक्रम पोस्ट करताना #sveepahmednagar हा हॅशटॅग वापरावा.शक्य झाल्यास विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले उपक्रम लाईव्ह करून व्यवस्थित माहिती देखील द्यावी.संपूर्ण उपक्रम राबवताना आदर्श आचारसंहितेचे पालन आवश्यक आहे.
उपक्रमासाठी राहुल पाटील(उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी ) ,प्रदीप पाटील(तहसीलदार-निवडणूक), स्वीप समिती सदस्य बाळासाहेब बुगे(उपशिक्षणाधिकारी जि.प.अहमदनगर),नायब तहसीलदार प्रशांत गोसावी,जिल्हा मतदारदूत डॉ अमोल बागुल,जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा निवडणूक शाखा, जि.प.शिक्षण विभाग आदी परिश्रम घेत आहेत.