इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
माढा लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याचे शरद पवारांनी ठरवले. पण, त्यांनी महायुतीला साथ देत परभणीतून उमेदवारी करण्याचा निर्णय़ घेतला. पण, या घडामोडीमुळे राष्ट्रवादी शरद पवारांचा उमेदवार अजून ठरत नाही. भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी द्यायची याचा अद्याप निर्णय पवार गटाचा होत नाही.
या जागेवर धैर्यशील मोहिते पाटलांचा विचार केला जात असला, तरी त्यांचा राष्ट्रवादीत अद्याप प्रवेश झालेला नाही. मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यास अभयसिंह जगताप किंवा डॉ. अनिकेत देशमुख यापैकी एकाला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
पवार यांनी वारंवार माढा लोकसभेतून धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्याची भाषा केल्याने धनगर समाजातील नेते शरद पवार यांची भेट घेत आहेत. माढा लोकसभेतून कोणाच्या हाती तुतारी द्यायची, असा गंभीर प्रश्न शरद पवार यांच्यासमोर आहे. माढा बरोबरच सातारा, रावेर, भिवंडी यासह अजून एका मतदार संघाचे उमेदवार पवार गटाचे ठरत नाही.