इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
साताराः सातारा लोकसभा मतदार संघात भाजपने छत्रपती उद्ययनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादीने त्यांच्या विरोधात सक्षम उमेदवार उभे करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना या ठिकाणी उभे करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पृथ्वीराज चव्हाण यांच्यात आज बंद खोलीत चर्चा झाली. त्यानंतर या चर्चेला उधाण आले. चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी ही भेट दिली.
साता-यात जर पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली तर ते काँग्रेस की राष्ट्रवादीकडून उभे राहणार याचीही आता चर्चा रंगली आहे. दरम्यान सातारा काँग्रेसला व भिवंडी राष्ट्रवादीला द्यावा असा फॅार्म्यूला पुढे आला आहे. पण, या भेटीत नेमके काय घडलं हे मात्र समोर आले नाही. या चर्चेनंतर पाटील यांनी माध्यमांशी बोलण्याचे टाळले.
पण, या बैठकीत सातारा लोकसभा मतदारसंघातील घडामोडींवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद रंगला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीमुळे निवडणूक लढवायला नकार दिला आहे. त्यामुळे कोण निवडणूक लढवणार याची चर्चा रंगली आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी साताऱ्याचा दौरा केला. त्यांनी उमेदवारीबाबत काहीच सांगितले नसले, तरी बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे आणि सत्यजीत पाटणकर आणि या नावांची चर्चा सुरू आहे.