इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हिंगोलीः संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याची घटना घडल्यामुळे महायुतीमध्ये असलेल्या घटक पक्षातील अंतर्गत विरोध समोर आला. हिंगोली लोकसभा मतदारसंघात भाजपला जागा न मिळाल्यामुळे ही नाराजी समोर आली.
यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी ही जागा भाजपला देण्याची मागणी केली.
हिंगोली लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यामुळे भाजपने येथे विरोध सुरु केला आहे. गेल्या अडीच वर्षापासून या मतदार संघात प्रचारही सुरू केला असतांना ही उमेदवारी शिवसेनेला दिल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते येथे आक्रमक झाले आहे.
लोकसभेच्या प्रचाराच्या नियोजनासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. याच बैठकीत कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली हिंगोली लोकसभेसाठी भाजपचाच उमेदवार हवा, अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली. कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठ नेत्यांकडे पोहोचवण्याचे आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. पुढील चार दिवसांत ही जागा भाजपला सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले.