इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
निवडणुकीत कोण कोणते आश्वासन देईल हे सांगत येत नाही. पण, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या पेंढरी येथे राहणाऱ्या वनिता राऊत दिलेले आश्वासन मात्र चांगलेच चर्चेत आहे. राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खासदार झाल्यास त्यांच्या आश्वासनांच्या यादीत स्वस्त धान्य दुकानातून आनंदाचा शिधासह दारू व बियरची विक्री करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यासोबतच बेरोजगार युवकांना दारूचे परवाने वितरित करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
याआधी राऊत यांनी चिमूर विधानसभेच्या निवडणूक प्रचारात मद्याविषयीची आश्वासने दिली होती.; मात्र त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. त्या राऊत म्हणाल्या की चंद्रपुरात दारूबंदी आहे आणि नागपुरात नाही. त्यामुळे चंद्रपूरच्या लोकांनी कोणते पाप केले आहे. चंद्रपूरचे लोक कायदेशीर मार्गाने दारू पिऊ शकत नाही आणि नागपुरातील पिऊ शकतात. त्यासाठी मी चंद्रपुरातून दारूबंदी हटवण्याचा विषय मांडला होता. दारुबंदी हटवण्यात आली असली, तरी बिअर बार, बेरोजगारांना दारू विक्रीचे परवाने देण्याचा आणि दारिद्र्यरेषेखाली लोकांना रेशन कार्डवर बिअर, व्हिस्की मिळावी. या मागण्या घेऊन मी प्रचारात उतरले आहे.
सरकार सणासुदीला आनंदाचा शिधा देते. त्या आनंदाच्या शिधासोबत सरकारने गोरगरिबांना भारी भारी ब्रॅण्डच्या बिअर, व्हिस्की द्याव्यात. मला खासदार केले, तर खासदार निधीतून दारू पिणाऱ्या गोरगरिब लोकांना आनंदाच्या शिधासोबत बिअर, व्हिस्की देईल, असे वनिता म्हणाल्या. त्यामुळे त्यांचे हे आश्वासन चांगलेच चर्चेत आहे.