इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात उमेदवारीवरून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. दानवे यांनी खैरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना पेढा भरवून शुभेच्छा दिल्या.
या वेळी दोन्ही नेत्यांनी हसतखेळत एकमेकांशी संवाद साधला. एकमेकांना पेढा भरवत आपल्यातील वाद संपल्याचे जाहीर केले. या वेळी खैरे म्हणाले, ‘की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हा दोघांशी संवाद साधून आपापसात वाद का घालता अशी विचारणा केली. आम्हा दोघांना त्यांनी खंबीर नेते असल्याची जाणीव करून दिली. त्यानंतर आम्ही दोघांनी चर्चा केली. त्यातून आम्ही एकत्र आलो.
या भेटीनंतर दानवे यांनी सोशल मीडिया टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, संभाजीनगर शिवसेना लोकसभा उमेदवार चंद्रकांतजी खैरे यांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. उमेदवारी घोषित झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. तसेच शिवसेनाप्रमुख हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने व पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोठया ताकदीने संभाजीनगर लोकसभा मतदार संघावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकण्यासाठी मनोकामना केली. याप्रसंगी माझ्यासमवेत शिवसेना विभागीय सचिव अशोक पटवर्धन,महापौर नंदकुमार घोडेले,रेणुकादास वैद्य, राजेंद्र दानवे, सचिन खैरे व सचिन तायडे उपस्थित होते.