इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चेन्नई : तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम हे लोकसभा निवडणूक लढविताना अनोख्या संकटात सापडले आहेत. त्यांच्याविरोधात एक-दोन नव्हे तर तब्बल चार असे उमेदवार आहेत, की ज्यांचे नाव पनीरसेल्वमच आहे. विरोधी पक्षांकडून पनीरसेल्वम यांच्याविरोधात सुनियोजितपणे षडयंत्र आखण्यात आले आहे.
ओ. पनीरसेल्वम हे रामनाथपुरम या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अण्णा द्रमुक पक्षामधून हकालपट्टी झाल्यानंतर ते ‘अण्णा द्रमुक कायकर्ते पुनर्प्राप्ती संघटना’ या पक्षाच्या माध्यमातून राजकारणात तग धरण्याचा प्रयत्न करीत आहेत. रामनाथपुरममधून त्यांच्याविरोधात चार त्यांच्यासमान नाव असलेले उमेदवार आहेत.
ओचप्पन पनीरसेल्वम, ओय्या थेवर पनीरसेल्वम, ओचा थेवर पनीरसेल्वम आणि ओय्याराम पनीरसेल्वम अशी अन्य चार उमेदवारांची नावे आहेत. यातील ओय्याराम पन्नीरसेल्वम हे रामनाथपुरम जिल्ह्यातील आहेत; मात्र अन्य तिघे शेजारील मदुराई जिल्ह्यातील आहेत. माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांच्यासह पाचही उमेदवार अपक्ष म्हणूनच रिंगणात आहेत. या मतदारसंघात येत्या १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ‘अण्णा द्रमुक’चे प्रमुख ई. पलानीस्वामी यांनी पनीसेल्वम यांच्याविरोधात षडयंत्र रचले आहे. त्यामुळे समान नावाचे चार उमेदवार उतरविण्यात आले आहे, असा आरोप पनीरसेल्वम यांच्या समर्थकांनी केला आहे