नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात गोमांसाची रिक्षातून विक्री होत असल्याचे समोर आल्यानंतर याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारतनगर भागात सकाळच्या सुमारास रिक्षाचालकाला पथकाने पकडून त्याच्याकडून सुमारे ३०० किलो मांस जप्त केले आहे.
फिरोज मजीद कुरेशी (४३ रा.वडाळागाव) असे संशयित रिक्षाचालकाचे नाव आहे. मुंबई नाका पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाचे अंमलदार राजेंद्र नाकोडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. वडाळा पाथर्डी रोड वरील भारतनगर भागात सकाळच्या सुमारास अॅटोरिक्षातून गोमांस वाहतूक केले जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि.२९) सकाळी सापळा लावण्यात आला होता.
भारतनगर चौफुली भागात पथकाने पाठलाग करून एमएच १५ झेड ७८३५ या अॅटोरिक्षाची तपासणी केली असता त्यात कत्तल केलेले गोवंश जातीच्या जनावरांचे सुमारे ५६ हजार रूपये किमतीचे २८० किलो वजनाचे मांस मिळून आले. संशयित चालकास बेड्या ठोकत पथकाने अॅटोरिक्षासह मांस असा १ लाख ३६ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणी पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्रीनिवास देशमुख,हवालदार राजू टेमगर,अंमलदार सागर जाधव व राजेद्र नाकोडे आदींच्या पथकाने केली.