इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः बारामती लोकसभा मतदार संघातून सुनेत्रा पवार यांची अधिकृत उमेदवारी आज जाहीर करण्यात आली. त्याचप्रमाणे महायुतीकडून परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली.
बारामतीत सुनेत्रा पवार विरुध्द सुप्रिया सुळे तर परभणीत महाविकास आघाडीचे खासदार संजय जाधव विरुद्ध महादेव जानकर अशी थेट लढत होणार आहे. तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आतापर्यंत तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात सुनेत्रा पवार, शिवाजीराव आढळराव पाटील आणि तटकरे यांच्या नावाचा समावेश आहे. एक जागा महादेव जानेकर यांच्यासाठी सोडण्यात आली आहे.
परभणीची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातून
भारतीय जनता पक्ष, शिवसेना, व राष्ट्रवादीच्या वाटाघाटीत परभणीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली. परभणीची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातून रासपला देण्यात आली. भाजपने २४ जागांचे उमेदवार घोषित करण्यात आले. शिवसेनेच्या शिंदे गटाने आठ उमेदवार जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसने सात-आठ जागा मागितल्या आहेत.