इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः बारामती लोकसभा मतदार संघातून माजी आमदार विजय शिवतारे यांनी अखेर लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीत समेट झाला होता. पण, त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून निवडणुकीत माघार घेण्याचा निर्णय घेतला.
याअगोदर कुणी कितीही सांगितले, तरी निवडणूक लढवू, असा पवित्रा शिवतारे यांनी घेतला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची मोठी अडचण झाली होती. या मतदार संघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा प्रतिष्ठेचा मुद्दा झाला होता; पण आता शिवतारे यांनी आपली तलवार म्यान केल्यामुळे अजितदादांचा जीव भांड्यात पडला आहे.
शिवतारे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की मी माझ्या निर्णयावर ठाम होतो; पण एका फोनमुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. माझी उपमुख्यमंत्र्यांसोबत एकदा फोनवर चर्चा झाली होती. दोनवेळा शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली. मी ऐकत नसल्यामुळे मुख्यमंत्री माझ्यावर रागावले. मी बैठकीतून निघून आलो होतो. २६ तारखेला मला मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी खतगावकर यांचा एक फोन आला. मु्ख्यमंत्र्यांची अडचण होत आहे. सर्व ठिकाणी एकमेकांविरोधात अपक्ष म्हणून उभे केले, तर महायुतीचे २२ उमेदवार पडतील, असे त्यांनी सांगितले. आपल्याला मुख्यमंत्र्यांना सांभाळावे लागेल. माझ्यामुळे वरिष्ठ नेत्यांचे गैरसमज झाले तर ते चालणार नाही. हे मला खतगावकरांनी पटवल्यामुळे मी माघार घेतल्याचे शिवतारे यांनी सांगितले.
राज्याचे हीत व नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी मी माघार घेतली, ते म्हणाले. महायुतीच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांना पुरंदरमधून दीड लाख मतांची आघाडी मिळवून देण्याचा संकल्प त्यांनी केला. लोकसभेच्या तयारीसाठी उभी केलेली यंत्रणा सुनेत्रा पवार यांच्या प्रचारकार्यासाठी देईल, असे ते म्हणाले.